जीवन संजीवन सेवा ट्रस्ट - आनंदाश्रय


आमच्या विश्वात तुमचे स्वागत

आनंदमय आश्रय देण्याचा एक प्रयत्न. आश्रय कुणाला तर या विशाल जगात ज्यांना कुणीच वाली नाही अशांना. वाली नाही असे म्हणण्यापेक्षा ज्यांच्या घरच्यांनी, समाजाने ज्यांना नाकारले अशांना. जे आयुष्यभर कबाडकष्ट करून आयुष्याच्या संध्याकाळी पार थकून गेले व निर्धन, निराधार आहेत. ज्यांची काळजी घेणारे हक्काचे असे या जगात कुणीच नाही.

आजच्या धकाधकीच्या जीवनात जीथे जीवलगांना आपल्यासाठी वेळ नाही तीथे समाजात स्वतःची मुले किंवा नातेवाईक नसलेल्या निराधार व्यक्तीला कोण विचारणार. निर्धन म्हातारपण व तशातच येणारे शारीरिक आजार, मानसिक कमकुवतपणा. कल्पना करा अशी व्यक्ती कशा प्रकारे जगत असते. जगत असते कि मरणाची वाट पाहत असते.

पण अशा सगळ्यांना आता आधार आहे तो आनंदाश्रयचा. इथे फक्त अन्न, वस्त्र, निवाराच नव्हे तर वैद्यकीय उपचारासमवेत मायेचे शब्दही आहेत. अणावच्या परबकाकांच्या संकल्पनेतून हे अनमोल समाजकार्य घडत आहे. गेली पाच वर्षे परबकाका त्यांच्या सहकार्‍यांसोबत कुठलाही गाजावाजा न करता हे कार्य करीत आहेत. मित्राच्या भाड्याच्या जागेत सुरू कलेले हे सत्कार्य आता वाढू लागले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील काही मान्यवर विश्वस्त म्हणून सोबत आल्याने तांत्रिकता व औपचारिकता म्हणून या सत्कार्याने आता नवीन नाव धारण केले आहे पण माया तीच. आनंदाश्रयमध्ये निराधारांना जिव्हाळ्याचे कौटुंबिक जीवन देण्याचा एक उपक्रम आणि तोही आजीवन. अगदी अंतिम संस्कार होईपर्यंतची निरपेक्ष सोबत.

भाड्याच्या जागेतून मालकीच्या जागेत जाण्यासाठी आपणही ह्या सत्कार्यात सहभागी व्हावे. नवीन जागेत क्षमता वाढवणे, दवाखाना, जगण्याचा उत्साह वाढवणारे उपक्रम राबवणे असे अनेक उद्देश आहेत. यासाठी आर्थिक मदतीची तातडीने गरज आहे.

मदतीचा हात पुढे करा, मानवतेला प्राधान्य द्या!


आमच्या विश्वात तुमचे स्वागत

कळविण्यास आनंद होतो की आपल्या आनंदाश्रयच्या पक्क्या आर सी सी इमारतीचे काम लवकरच पूर्ण होईल .आणि हे मा. रघुवीर मंत्री स्वखर्चाने करीत आहेत. सोबतच अति दक्षता रूमचे पक्के आर सी सी काम या आठ दिवसात हाती घेतले जाईल व पूर्णत्वास जाईल व ही पाच लाख चाळीस हजार रुपये खर्चाची जबाबदारी आपल्या वैशाली गावडे ताईंनी स्वइच्छेने स्वीकारली आहे. या दक्षता रूम शेजारीच आपलं पंधरा बाय दहाचं कार्यालय आहे त्याचा खर्च दोन लाख पन्नास हजार असून त्याची जबाबदारी कुणीतरी दानशूर हितचिंतकाने स्वीकारली की आपलं महत्त्वाचे पक्के बांधकाम पूर्ण होईल बाकी देवाक काळजी !

1 एप्रिल 2016 ! हाच तो दुर्दैवी दिवस. भाडेकरार संपल्यामुळे आनंदाश्रय परिवाराला विस्थापित होऊन या उघड्या माळावर यावं लागलं.परंतु तरुण भारत कडून समजताच आपण सर्व मदतीला धावून आलात. आपापल्या परीने मदत केली व महिन्यात निवाराशेडची उभारणी झाली. यात अनेक असुविधा राहिल्या. पण आधार झाला.

काही संवेदनशील दात्यांकडून पक्क्या इमारतीचा विचार गेली दोन वर्षे पुढे येत आहे.मदतीचीही तयारी आहे.बजेट मोठे आहे. अनेक हात त्यासाठी पुढे यायला हवेत.

पंधराशे रुपये चौरस फूट असा अंदाजे खर्च आहे. मागे याबाबत तरुण भारत मध्ये आवाहनही केले होते पण आमच्याच काही कारणास्तव सुरवातच करता आली नाही.

परंतु एक संवेदनाशील दानशूर बांधकाम व्यावसायिक मा. रघुवीर तथा भाई मंत्री आरवली यांनी अर्धे अधिक बांधकाम स्वखर्चाने करून देण्याची जबाबदारी स्वीकारली असून उर्वरीत बांधकामासाठी आपणा समाज बांधवांकडून आर्थिक मदतीची गरज आहे.

तरी यापुर्वी ज्या सह्रुदयतेने मदतीचा हात दिलात तसंच या उर्वरीत बांधाकामासाठी मदतीचा हात द्यावा ही नम्र विनंती


आपला कृपाभिलाषी, अध्यक्ष
जीवन संजीवन सेवा ट्रस्ट ,
आनंदाश्रय अणाव


Follow us on Facebook @anandashray

Are you ready to volunteer?